मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथांचा हरिपाठ

    ​१
    ​हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥१॥
    ​हरी मुखीं गातां हरपली चिंता । त्या नाहीं मागुता जन्म घेणें ॥२॥
    ​जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झालीं अंगें हरिरूप ॥३॥
    ​हरिरूप झालें जाणीव हरपले । मीतूंपणा गेलें हरीचे ठायीं ॥४॥
    ​हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
    ​२
    ​हरि बोला हरि बोला नातरी अबोला । व्यर्थ गलबला करूं नका ॥१॥
    ​नको अभिमान नको नको मान । सोडीं मीतूंपण तोचि सुखी ॥२॥
    ​सुखी त्याणें व्हावें जगा निववावें । अज्ञानी लावावे सन्मार्गासी ॥३॥
    ​मार्ग जया कळे भावभक्तिबळें । जगाचिये मेळे न दिसती ॥४॥
    ​जनीं वनीं प्रत्यक्ष लोचनीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥५॥
    ​३
    ​ओळखिला हरी धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरीं सिद्धीसहित ॥१॥
    ​सिद्धी लावी पिसें कोण तया पुसे । नेलें राजहंसें पाणी काय ॥२॥
    ​काय तें करावें संदेहीं निर्गुण । ज्ञानानें सगुण ओस केलें ॥३॥
    ​केलें कर्म झालें तेंचि भोगा आलें । उपजले मेले ऐसे किती ॥४॥
    ​एका जनार्दनीं नाहीं यातायाती । सुखाची विश्रांती हरीसंगें ॥५॥
    ​४
    ​जें जें दृष्टी दिसे तें तें हरिरूप । पूजा ध्यान जप त्यासी नाहीं ॥१॥
    ​वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्रीं देव । तयाविण ठाव रिता कोठें ॥२॥
    ​वैष्णवांचें गुह्य मोक्षांचा एकांत । अनंतासी अंत पाहतां नाहीं ॥३॥
    ​आदि मध्य अवघा हरि एक । एकाचे अनेक हरि करी ॥४॥
    ​एकाकार झाले जीव दोन्ही तिन्ही । एका जनार्दनीं ऐसें केलें ॥५॥
    ​५
    ​नामाविण मुख सर्पाचें तें बीळ । जिव्हा काळसर्प आहे ॥१॥
    ​वाचा नव्हे लांब जळो त्याचें जिणें । यातना भोगणें यमपुरीं ॥२॥
    ​हरीविण कोणी नाहीं सोडविता । पुत्र बंधु कांता संपत्तिचे ॥३॥
    ​अंतकाळीं कोणी नाहीं बा सांगाती । साधूचे संगतीं हरी जोडे ॥४॥
    ​कोटि कुळें तारी हरि अक्षरें दोन्ही । एका जनार्दनीं पाठ केलीं ॥५॥
    ​६
    ​धन्य माय व्याली सुकृताचें फळ । फळ निर्फळ हरीविण ॥१॥
    ​वेदांताचें बीज हरि हरि अक्षरें । पवित्र सोपारें हेंचि एक ॥२॥
    ​योग याग व्रत नेम दानधर्म । नलगे साधन जपतां हरि ॥३॥
    ​साधनाचें सार नाम मुखीं गातां । हरि हरि म्हणतां कार्यसिद्धी ॥४॥
    ​नित्य मुक्त तोचि एक ब्रह्मज्ञानी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
    ​७
    ​बहुतां सुकृतें नरदेह लाधला । भक्तीविण गेला अधोगती ॥१॥
    ​पाप भाग्य कैसे न सरेचि कर्म । न कळेचि वर्म अरे मूढा ॥२॥
    ​अनंत जन्मींचें सुकृत पदरीं । त्याचे मुखीं हरि पैठा होय ॥३॥
    ​राव रंक हो कां उंच नीच याती । भक्तीविण माती मुखीं त्याच्या ॥४॥
    ​एका जनार्दनीं हरि हरि म्हणतां । मुक्ती सायुज्यता पाठी लागे ॥५॥
    ​८
    ​हरिनामामृत सेवी सावकाश । मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढें ॥१॥
    ​नित्य नामघोष जयाचे मंदिरीं । तेचि काशीपुरी तीर्थक्षेत्र ॥२॥
    ​वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे । अविनाशासी पाहे नाश कैचा ॥३॥
    ​एका तासामाजीं कोटि वेळा सृष्टी । होती जाती दृष्टि पाहें तोचि ॥४॥
    ​एका जनार्दनीं ऐसें किती झालें । हरिनाम सेविलें तोचि एक ॥५॥
    ​ ९
    ​भक्तीविण पशु कशासी वाढला । सटवीने नेला कैसा नाहीं ॥१॥
    ​काय माय गेली होती भूतापासीं । हरि न ये मुखासी अरे मूढा ॥२॥
    ​पातकें करिता पुढें आहे पुसता । काय उत्तर देतां होशील तूं ॥३॥
    ​अनेक यातना यम करवील । कोण सोडवील तेथें तुजला ॥४॥
    ​एका जनार्दनीं सांगताहें तोंदें । आहा वाचा रडे बोलतांचि ॥५॥
    ​१०
    ​स्वहिताकारणें संगती साधूची । भावें भक्ति हरीची भेटी तेणें ॥१॥
    ​हरि तेथें संत संत तेथें हरी । ऐसें वेद चारी बोलताती ॥२॥
    ​ब्रह्मा डोळसातें वेदार्थ ना कळे । तेथें हे आंधळे व्यर्थ होती ॥३॥
    ​वेदार्थाचा गोंवा कन्याभिलाष । वेदें नाहीं ऐसें सांगितलें ॥४॥
    ​वेदांचीं हीं बीजाक्षरें हरी दोनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
    ​११
    ​सत्पद तें ब्रह्म चित्पद तें माया ।  आनंदपदीं जया म्हणती हरी ॥१॥
    ​सत्पद निर्गुण चित्पद सगुण । सगुण निर्गुण हरिपायीं ॥२॥
    ​तत्सदिति ऐसें पैल वस्तूवरी । गीतेमाजी हरि बोलियेले ॥३॥
    ​हरिपदप्राप्ती भोळ्या भाविकांसी । अभिमानियांसी नर्कवास ॥४॥
    ​अस्ति भाति प्रिय ऐशीं पदें तिनी । एका जनार्दनीं तेंचि झालें ॥५॥
    ​१२
    ​नाकळे तें कळे कळे तें नाकळे । वळे तें ना वळें गुरुविणें ॥१॥
    ​निर्गुण पावलें सगुणीं भजतां । विकल्प धरितां जिव्हा झडे ॥२॥
    ​बहुरूपी घरी संन्यासाचा वेष । पाहोन तयास धन देती ॥३॥
    ​संन्याशाला नाहीं बहुरूपियाला । सगुणीं भजला तेथें पावे ॥४॥
    ​अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥५॥
    ​१३
    ​ओळखिला हरि सांठविला पोटीं । होतां त्याची भेटी दुःख कैंचें ॥१॥
    ​नर अथवा नारी हो कां दुराचारी । मुखीं गातां हरि पवित्र तो ॥२॥
    ​पवित्र तें कुळ धन्य त्याची माय । हरि मुखें गाय नित्य नेमें ॥३॥
    ​काम क्रोध लोभ जयाचे अंतरीं । नाहीं अधिकारी ऐसा येथें ॥४॥
    ​वैष्णवांचें गुह्य काढिलें निवडुनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
    ​१४
    ​हरि बोला देतां हरि बोला घेतां । हांसतां खेळतां हरि बोला ॥१॥
    ​हरि बोला गातां हरि बोला खातां । सर्व कार्य करितां हरि बोला ॥२॥
    ​हरि बोला एकांतीं हरि बोला लोकांतीं । देहत्यागांतीं हरि बोला ॥३॥
    ​हरि बोला भांडतां हरि बोला कांडतां । उठतां बैसतां हरि बोला ॥४॥
    ​हरि बोला जनीं हरि बोला विजनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
    ​१५
    ​एक तीन पांच मेळा पञ्चवीसांच । छत्तिस तत्त्वांचा मूळ हरि ॥१॥
    ​कल्पना अविद्या तेणे झाला जीव । मायोपाधी शिव बोलिजेति ॥२॥
    ​जीव शिव दोन्ही हरिरूपीं तरंग । सिंधु तो अभंग नेणें हरी ॥३॥
    ​शुक्तीवरी रजत पाहतां डोळां दिसे । रज्जूवरी भासे मिथ्या सर्प ॥४॥
    ​क्षेत्र\-क्षेत्रज्ञातें जाणताती ज्ञानी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
    ​१६
    ​कल्पनेपासूनी कल्पिला जो ठेवा । तेणें पडे गोंवा नेणे हरी ॥१॥
    ​दिधल्या वांचूनि फळप्राप्ति कैंची । इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा ॥२॥
    ​इच्छावे ते जवळी चरण हरीचे । चरण सर्व नारायण देतो तुज ॥३॥
    ​न सुटे कल्पना अभिमानाची गांठी । घेतां जन्म कोटी हरि कैंचा ॥४॥
    ​एका जनार्दनीं सांपडली खूण । कल्पना अभिमान हरि झाला ॥५॥
    ​१७
    ​काय पद्मनीचे षंढासी सोहळे । वांझेसी दोहाळे कैची होती ॥१॥
    ​अंधापुढें दीप खरासी चंदन । सर्पासी दुधपान करूं नये ॥२॥
    ​क्रोधि अविश्वासी त्यासी बोध कैंचा । व्यर्थ आपुली वाचा शिणवूं नये ॥३॥
    ​खळाची संगती उपयोगासी न ये । आपणा अपाय त्याचे संगे ॥४॥
    ​वैष्णवीं कुपथ्य टाकिल वाळूनी । एका जनार्दनीं तेचि भले ॥५॥
    ​१८
    ​न जायेचि ताठा नित्य खटाटोप । मण्डुकीं वटवट तैसे ते गा ॥१॥
    ​प्रेमावीण भजन नाकाविण मोती । अर्थाविण पोथी वाचुनी काय ॥२॥
    ​कुंकवा नाहीं ठावे म्हणे मी आहेव । भावावीण देव कैसा पावे ॥३॥
    ​अनुतापेवीण भाव कैसा राहे । अनुभवें पाहें शोधूनियां ॥४॥
    ​पाहतां पाहणें गेलें तें शोधूनी । एका जनार्दनीं अनुभविलें ॥५॥
    ​१९
    ​परिमळ गेलिया वोस फुल देठीं । आयुष्या शेवटीं देह तैसा ॥१॥
    ​घडीघडी काळ वाट याची पाहे । अजून किती आहे अवकाश ॥२॥
    ​हाचि अनुताप घेऊन सावध । कांहीं तरी बोध करीं मना ॥३॥
    ​एक तास उरला खट्वांग रायासी । भाग्यदशा कैसी प्राप्त झाली ॥४॥
    ​सांपडला हरि तयाला साधनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
    ​२०
    ​करा रे बापांनो साधन हरीचें । झणीं करणीचें करूं नका ॥१॥
    ​जेणें बा न ये जन्म यमाची यातना । ऐशिया साधना करा कांहीं ॥२॥
    ​साधनाचें सार मंत्रबीज हरी । आत्मतत्त्व धरी तोचि एक ॥३॥
    ​कोटि कोटि यज्ञ नित्य ज्याचा नेम । एक हरि नाम जपतां घडे ॥४॥
    ​एका जनार्दनीं न घ्यावा संशय । निश्चयेंसी होय हरिरूप ॥५॥
    ​२१
    ​बारा सोळा जणी हरीसी नेणती । म्हणोनी फिरती रात्रंदिवस ॥१॥
    ​सहस्र मुखांचा वर्णितां भागला । हर्ष जया झाला तेणें सुखें ॥२॥
    ​वेद जाणूं गेला पुधें मौनावला । तें गुह्य तुजला प्राप्त कैंचें ॥३॥
    ​पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा । दास सद्गुरूचा तोचि जाणे ॥४॥
    ​जाणते नेणते हरीचे ठिकाणीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
    ​२२
    ​पिंडीं देहस्थिती ब्रह्मांडीं पसारा । हरिविण सार व्यर्थ भ्रम ॥१॥
    ​शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिलमुनी । हरिसी जाणोनि हरिच झाले ॥२॥
    ​या रे या रे धरूं हरिनाम तारूं । भवाचा सागरू भय नाहीं ॥३॥
    ​साधुसंत गेले आनंदीं राहिले । हरिनामें झाले कृतकृत्य ॥४॥
    ​एका जनार्दनीं मांडिलें दुकान । देतो मोलावीण सर्व वस्तु ॥५॥
    ​२३
    ​आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥
    ​नको खेद करूं कोणत्या गोष्टीचा । पति तो लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥
    ​सकळ जीवांचा करितो सांभाळ । तुज मोकलील ऐसें नाहीं ॥३॥
    ​जैसी स्थिति आहे तैशापरी राहें । कौतुक तूं पाहें संचिताचें ॥४॥
    ​एका जनार्दनीं भोग प्रारब्धाचा । हरिकृपें त्याचा नाश झाला ॥५॥
    ​२४
    ​दुर्बळाची कन्या समर्थाने केली । अवदसा निमाली दरिद्राची ॥१॥
    ​हरिकृपा होतां भक्तां निघती दोंदें । नाचती स्वानंदें हरिरंगीं ॥२॥
    ​देव भक्त दोन्ही एकरूप झाले । मुळींच संचलें जैसें तैसें ॥३॥
    ​पाजळली ज्योती कापुराची वाती । ओवाळितां आरती भेद नुरे ॥४॥
    ​एका जनार्दनीं कल्पेंची मुराला । तोचि झाला ब्रह्मरूप ॥५॥
    ​२५
    ​मुद्रा ती पांचवी लावूनियां लक्ष । तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे ॥१॥
    ​कानीं जें पेरिलें डोळां तें उगवलें । व्यापकें भारले तोचि हरि ॥२॥
    ​कर्म-उपासना-ज्ञानमार्गीं झाले । हरिपाठीं आले सर्व मार्ग ॥३॥
    ​नित्य प्रेमभावें हरिपाठ गाय । हरिकृपा होय तयावरी ॥४॥
    ​झाला हरिपाठ बोलणें येथूनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...